
cast certificate:-जात प्रमाणपत्रआणि जात वैधता प्रमाणपत्र आता एका क्लिकवर मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांचा होणारा त्रास वाचणार आहे.
जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळविणसाठी लाभार्थी अर्जदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यासाठी सरकारी कार्यालयात बऱ्याचदा फेऱ्या माराव्या लागत. तरी देखील कधी कधी काम न होता माघारी फिरावे लागत असे. मात्र आता नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र आता एका क्लिकवर मिळणार आहे. ही सर्व प्रक्रिया जलद आणि सुलभ होण्यासाठी संगणकीय ऑनलाइन प्रणाली विकसित केली जाणार आहे. या प्रस्तावाला राज्य सरकारने तत्वता: मान्यता दिली असून येत्या काही दिवसात ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्ग यांना सरकारी नोकऱ्या, शैक्षणिक प्रवेश, निवडणूक आरक्षण आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. सध्याच्या प्रक्रियेत हे प्रमाणपत्र काढण्यासाठी खूप अडचणी येतात. तसेच, अनेक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी ही अडचणी येतात.
राज्य सरकारने बार्टी म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (टीसीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून जात वैधता प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. या योजनेला सरकारने तत्त्वात: मंजुरी दिली आहे.
बदल काय होणार?
जात वैधता प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्रासाठी नागरिकांनी केलेल्या अर्जासाठी एआयचा वापर होणार आहे. यामध्ये डिजिलॉकर सारख्या प्लॅटफॉर्मसह एकत्रित काम केले जाणार आहे.
अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मूळ पत्ता, वडिलांचे नाव, पतीचे नाव ही माहिती थेट आधार कार्डची संलग्न करून पडताळणी केली जाणार आहे.
तसेच या प्रक्रियेमुळे चुकीची नोंद किंवा अर्जातील कागदपत्रांची त्रुटी लगेच दाखवली जाईल. त्यामुळे चूक लगेच दुरुस्त करता येईल.
अर्ज करताना एकच अर्ज आणि एकच प्रक्रिया असेल त्याद्वारे प्रमाणपत्र वितरीत केले जाईल.
ही प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक असेल. तसेच त्यामुळे दलालांचे काम देखील संपेल. त्यांच्याकडून होणारी संभाव्य फसवणूक टाळता येईल.
Leave a Reply