
शेत जमिनीचे सातबारा उताऱ्यावर नोंद असलेले पोट खराब क्षेत्र म्हणजे अशा जमिनीचा भाग जो की, शेती करण्यासाठी योग्य नाही किंवा नापिक आहे. अनेक वेळा जमिनीच्या वारसांतरे, पिढ्यानपिढ्या चालत आलेली नोंद किंवा चुकीच्या मोजणीमुळे पोट खराब क्षेत्राची आकडेवारी सातबारा उताऱ्यावर जास्त नोंदली जाते. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज मिळवताना, शासकीय योजनांचा लाभ घेताना किंवा जमीन विक्री करताना अनेक अडचणी निर्माण होतात. अशावेळी पोट खराब क्षेत्र कमी करण्यासाठी योग्य ती प्रक्रिया करणे आवश्यक असते.
पोट खराब क्षेत्र कमी करण्यासाठी काय करावे लागते?
जर शेतकऱ्याला वाटत असेल की त्यांच्या जमिनीवर नोंदवलेले पोट खराब क्षेत्र प्रत्यक्षात नाही किंवा ते क्षेत्र आता सुधारित आहे, तर त्यांनी अधिकृतपणे महसूल विभागाकडे अर्ज करावा.
तहसील कार्यालयात अर्ज करा.
शेतकऱ्यांनो संबंधित तहसील कार्यालयात एक अर्ज द्यावा लागतो. अर्जात स्पष्ट नमूद करा की, आपल्या शेत जमिनीवरील पोट खराब क्षेत्र चुकीचे आहे किंवा आता ती जमीन सुपीक झाली आहे आणि त्यामुळे पोट खराब क्षेत्राची नोंद कमी करावी.
जमीन मोजणीची मागणी करा
पोट खराब क्षेत्र कमी करण्यासाठी शासकीय मोजणी अनिवार्य आहे. यासाठी मोजणी अधिकारी किंवा तलाठ्यांकडे मोजणीसाठी विनंती करावी लागते. मोजणी अधिकारी प्रत्यक्ष शेतावर येऊन स्थिती तपासून मोजणी करतो.
प्रत्यक्ष ई – पीक पाहणी आणि नोंद
मोजणी दरम्यान अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाते. जमिनीचा प्रत्यक्ष उपयोग, जमीन सुपीकतेची स्थिती, पाणीपुरवठा, पिकांची स्थिती याची नोंद केली जाते.
अहवाल तयार आणि सातबारा उताऱ्यावर दुरुस्ती
मोजणी अधिकाऱ्याचा अहवाल तयार झाल्यावर तो तहसील कार्यालयाकडे दिला जातो. या अहवालाच्या आधारे पोट खराब क्षेत्र कमी करण्याचा प्रस्ताव महसूल खात्याने मंजूर केला, तर सातबारा उताऱ्यावरची नोंद दुरुस्त होते आणि नवीन सातबारा उतारा मिळतो.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
- शेतकऱ्यांची ओळखपत्र(आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड)
- जमिनीचा सध्याचा सातबारा उतारा.
- जमीन धारकाचा फेरफार उतारा(जर वारसातर झाले असेल तर).
- मोजणी शुल्काची पावती (जर शुल्क भरले असेल तर).
- जमीन वापराचे प्रमाण दर्शवणारे पुरावे(उदाहरणार्थ. शेतीचा फोटो, पिकांचे प्रकार)
Leave a Reply