
भूमापन आणि शेतजमीच्या नोंदणी संदर्भातील प्रक्रियेमध्ये पोट खराब क्षेत्राची सुस्पष्ट आणि स्वतंत्र नोंद करणे आवश्यक असते. अशा जमिनी शेतीसाठी अयोग्य असल्यामुळे त्यांचा उपयोग, वर्गीकरण आणि नोंदणी एक विशिष्ट प्रणाली द्वारे केली जाते. यामध्ये पोट खराब वर्ग ‘अ’ आणि पोट खराब वर्ग ‘ब’ अशा दोन प्रमुख प्रकारांचा समावेश असतो.
पोट खराब वर्ग ‘अ’ म्हणजे काय?
शेतीसाठी पूर्णत: अयोग्य असलेल्या जमिनीमध्ये खडकाळ जमीन, खोल नाले, खंदक, तसेच खान क्षेत्राचा समावेश होतो. ही सर्व क्षेत्रे पोट खराब वर्ग ‘अ’ म्हणून ओळखली जातात. परंतु अशा नोंदी करण्याआधी त्या भूभागाची भूमापन अभिलेखांवरून पडताळणी करणे आवश्यक आहे. म्हणजेच, जमिनीच्या प्रत्यक्ष नकाशावर आणि अभिलेखांवरून ती शेती योग्य नसल्याची खात्री करणे बंधनकारक असते.
पोट खराब वर्ग ‘ब’ म्हणजे काय?
दुसरीकडे, काही जमिनी विशिष्ट सरकारी किंवा सार्वजनिक प्रयोजनासाठी राखीव ठेवलेल्या असतात. जसे की सार्वजनिक रस्ते, नाले, कालवे, तलाव, इत्यादी. या जमिनीवर शेती करणे शक्य नसते, त्यामुळे त्या पोट खराब वर्ग ‘ब’ मध्ये समाविष्ट केल्या जातात. यामध्ये सार्वजनिक सुविधा आणि पायाभूत सुविधा उभारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भूभागांचा समावेश होतो.
नोंद करण्याची प्रक्रिया कशी असते?
गाव नोंदीत विशेषत: गाव नमुना ७ मध्ये या पोट खराब जमिनीची क्षेत्रफळानुसार स्वतंत्र नोंद करावी लागते. ही नोंदणी जिल्हा भूमापन कार्यालयात असलेल्या अधिकृत आकड्यांशी जोडून केली जाते. तथापि, जर अशा प्रकारची माहिती जिल्हा भूमापन कार्यालयात उपलब्ध नसेल, तर सध्या अस्तित्वात असलेल्या हक्क नोंदीतील एकूण पोट खराब क्षेत्राची नोंद घेतली जाते.
पोट खराब क्षेत्रावर आकारणी कशी केली जाते?
लागवडी योग्य जमिनीवर नियमित कृषी आकारणी आकारली जाते, परंतु पोट खराब क्षेत्रावर अशी कोणतीही कृषी आकारणी लावली जात नाही, कारण त्यातून उत्पन्न मिळण्याची शक्यता फारच कमी असते. गाव नमुना ८- अ मध्ये देखील केवळ लागवडी योग्य आणि आकारणी लागलेल्या जमिनीच दाखवल्या जातात.
जर एखाद्या भूमापन क्रमांकावरील सर्व क्षेत्र पोट खराब असेल, तर त्या जमिनीवर कोणतीही कृषी आकारणी दाखवली जात नाही. मात्र, अशा जमिनीतील काही भाग जर कृषी (बिनशेती), गोदाम, इमारत किंवा इतर व्यवसायिक वापर होत असेल तर त्या भागावर स्थानिक स्तरावर लागू असलेल्या दरानुसार आकारणी लावली जाते. ही कारणे हक्क पत्रकात दाखवली जातात. आणि त्याच्या वेळी गाव नमुना ८ – अ मध्येही संबंधित खातेदाराच्या खात्यावर नोंदवली जातात. दरम्यान, पोट खराब जमिनीची नोंद प्रक्रिया ही केवळ भूवर्गीकरणापूर्ती मर्यादित नसून, ती महसूल व शाश्वत नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे अशा जमिनीचा योग्य उपयोग, महसूल नोंदीची अचूकता आणि सरकारच्या जमिनी विषयक धोरणांची अंमलबजावणी अधिक प्रभावी पणे होते.
Leave a Reply